मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : येथील तापी पुलावरून वेगवेगळ्या घटनेत दोन जणांनी उडी घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. एकजण धुळे येथील तर दुसरा रामी, ता. शिंदखेडा येथील रहिवासी आहे. दोन्ही मृतदेह शुक्रवारी दुपारी हाती लागले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी धुळे येथील यश गांगुर्डे (२२) या युवकाने आपली दुचाकी (क्रमांक एमएच १८ एवाय ००६७) पुलावर उभी केली आणि पुलावरून थेट नदीत उडी मारली. या ठिकाणी पाण्याची खोली जास्त असल्याने शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. सारंगखेडा आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
गुरुवारीच रात्री उशिरा करण आनंदा कोळी (३०) रा. रामी, ता. शिंदखेडा या युवकाने देखील पुलावरून उडी घेतली. त्याने देखील त्याची दुचाकी (क्रमांक एमएच १८ बीयू ०१५६) पुलावर उभी केली. आणि नंतर उडी मारली. घटनेची माहिती मिळताच रामी गावातील तरुणाचे नातेवाईक व बघ्यांनी पुलावर मोठी गर्दी केली होती. करण कोळी हे प्रतापपूर तालुका तळोदा येथून लग्न समारंभ आटोपून आपल्या रामी गावाकडे निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या मागे त्यांचे शालक काही अंतरावर असताना त्यांना पुलावर करण कोळी यांची दुचाकी दिसल्याने त्यांना करण कोळी यांनी पुलावरून उडी घेतल्याचा संशय आल्याने त्यांनी नातेवाइकांना ही माहिती कळवली. करण कोळी यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
कोळी याचा मृतदेहही शुक्रवारी दुपारी शोधण्यात यश आले. काही तासांच्या अंतराने दोन घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, जमादार अकील पठाण, राजू वळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.