तळोदा : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख गटारींची साफ सफाई करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या गटारींवर अतिक्रमण करणा:या 60 जणांना पालिकेने येत्या 24 तसात अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरवर्षी पावसाळ्यात मुख्य गटारींच्या स्वच्छतेअभावी व्यावसायिकांना नदीच्या पुराचा सामना करावा लागत असतो. एवढेच नव्हे तर हे पाणी दुकानांमध्ये शिरून मालाचे मोठे नुकसानदेखील होत असल्याची व्यवसायिकांचे म्हणणे होते. याबाबत ‘लोकमत’ने वस्तुनिष्ठ वृत दिले होते. या वृताची दाखल घेत येथील नगर पालिकेने गेल्या आठवडय़ापासून शहरातील मुख्य गटारींसोबतच गल्ली, बोळातील गटारीमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे. हा गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढला जात आहे. तथापि गाळ काढतांना गटारीवरील मोठय़ा संख्येने झालेल्या अतिक्रमणामुळे गाळ काढण्यासाठी अडचणी येत आहेत. परिणामी तेथील गटार तशीच सोडून द्यावी लागत आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने अशा अतिक्रमण बहाद्दरना नोटीसा बजविल्या आहेत. दोन दिवसात गटारीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा पालिकाच अतिक्रमण हटवेल, असा ईशाराही नोटीसीत दिला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक पिशाव्यांचा वापरही थांबवा असे नमूद करून कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे. दरम्यान पालिकेने बजावलेल्या नोटीसांवर गटारीवरील अतिक्रमण धारक स्वता:हून अतिक्रमण काढतात की, पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दखवितात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पालिकेने यापूर्वीही या अतिक्रमण धारकांना नोटीसा बजविल्याचे म्हटले जाते.
तळोद्यातील गटारींवरील अतिक्रमणाला ‘अल्टीमेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:10 PM