लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ पाणी योजनेतून गावातील नळांना महिन्यातून एकदाच पाणी सोडण्यात येत असल्याने उर्वरित दिवसात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आह़े गावातील पाणीटंचाई दूर करावी या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांना दिले होत़े यानुसार येत्या चार दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर न झाल्यास 8 मार्च रोजी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढणार आहेत़ जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून या गावात भिषण पाणीटंचाई आह़े पाणी योजनेची पातळी खोल गेल्याने यातून पाणी येत नसल्याने चिंता वाढल्या आहेत़ उमर्दे खुर्द येथे पर्यायी पाणी योजना किंवा जुन्या पाणीयोजनेचे पुनरूज्जीवन करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आह़े मात्र त्यावर कारवाई झालेली नाही़ गेल्या तीन वर्षात पाणीटंचाईत वाढ झाल्याने ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े निवेदनावर गुलाब महारू मराठे, वेडू विठ्ठल पाटील, रमेश शिवराम मराठे, रामभाऊ काळू मराठे, गोविंद शंकर मराठे, गणपत बाबुराव मराठे, जयंत नारायण मराठे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत़
उमर्दे येथे महिन्यातून एकदाच येते नळाला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:22 PM