किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : ‘जिंदगी आसान नही होती, आसान बनना पडता है.., कुछ नजर अंदाज करके, कुछ बरदास्त करके..’ याचा प्रत्यय देणारे जीवन जगत आहे सातपुडय़ातील दुर्गम भागातील उमेश भिमसिंग वसावे हा बालक. एक हात व एक पाय नसलेला व जो हात आहे त्याचीही बोटे चिकटलेली. अशा स्थितीत कुठलाही आधार न घेता एका पायावर तब्बल चार किलोमिटर चालत जात तो शाळेत पोहचतो. खापरान या पर्वत माथ्यावरील गावातून पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आमली पुनर्वसन येथे तो दररोज ये-जा करतो. अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगरांगेतील गंगापूर गृपग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खापरान या छोट्याश्या गावात 35 घराची दीडशे लोकसंख्येची वस्ती. गाव उंचावर असल्याने प्राथमिक सुविधांपासून वंचीतच. याच गावात भिमसिंग कागड्या वसावे यांचा उमेश हा मुलगा. डावा पाय व उजवा हात नसलेला उमेश. जो हात आहे त्याचे बोटं देखील एकमेकांना चिकटलेले. केवळ अंगठा सुस्थीत. अशा स्थितीत कसलाही आधार न घेता उमेश दररोज शाळेसाठी साडेतीन ते चार किलोमिटर पायवाटेने पायपीट करतो. गेल्या पाच वर्षापासून त्याची ही दिनचर्या आहे. सध्या तो नववीत शिकत आहे. शिकण्याची जिद्द अंगी असल्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तो नियमित शाळेत येतो. अभ्यासात देखील तो हुशार आहे. त्याच्या कुटूंबात आई, वडील व एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. वडिल एक एकरच्या शेतीत कशीतरी गुजरान करतात. खूप शिकून मोठे व्हावे व वडिलांच्या गरीबीच्या परिस्थितीतून कुटूंबाला बाहेर काढावे अशी जिद्द उमेश बाळगून आहे. देवमोगरा आमली पुनर्वसन येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकही त्याला आवश्यक ती मदत करतात. उमेशला आता ख:या अर्थाने मदतीची गरज असून कृत्रीत अवयव भेटल्यास तो त्या आधारे सहज आपली दिनचर्या पार पाडू शकतो.
हाताचे बोटं चिकटलेले असल्याने एका बोटाच्या आधारे पेन पकडून लिहिण्याचे काम तो करतो. गावातच त्याने बालवाडी, जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथी चे शिक्षण पुर्ण केले. पुढील शिक्षणाची सुविधा चार किलोमिटर लांब देवमोगरा पुनर्वसन येथे असल्याने त्याने तेथे शिक्षण घेण्याचे ठरविले. शिक्षणाची जिद्द त्याला शांत बसू देत नाही. नियमित घरापासून चार किलोमीटर अंतरावर शाळेत जाण्यासाठी परत तेवढेच अंतर शाळेतुन घरी येण्यासाठी एका पायाने कसलाही आधार न घेता कुदत कुदत अंतर पार करीत असतो. वाटेने कुणी दुचाकीवाले भेटलेच तर त्याला तेवढी लिफ्ट भेटते.