लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिनाभरापासूनचे लॉकडाऊन आणि संचारबंदी असली तरी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या आनंदला मात्र कुठलाही तोटा नसल्याचे शहरासह ग्रामिण भागात दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नियम पाळत हा सण साजरा करण्यासाठीचा उत्साह दिसून येत आहे.यंदा अक्षय तृतीयेचा सण लॉकडाऊनमध्येच आणि कोरोनाच्या दहशतीखाली साजरा होत आहे. या सणानिमित्त होणारी उलाढाल तर आधीच ठप्प आहे. परंतु पारंपारिकदृष्टया हा सण साजरा करण्यासाठी जनतेमध्ये मोठा उत्साह आहे. ग्रामिण भागात गेल्या आठवडाभरापासून झोका बांधून त्यावर अक्षय तृतीयेचे पारंपारिक गाणी म्हणत खेळ खेळला जात आहे. याशिवाय पारंपारिकरित्या गौराईची देखील स्थापना करण्यात आली.यंदा अक्षय तृतीयेनिमित्त खरेदीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे मुर्हूत साधत खरेदी करणे, कामांचे भुमिपूजन, नवीन कामाचा शुभारंभ या बाबींना फाटा द्यावा लागला आहे. असे असले तरी काहीजण घरच्या घरी या उपक्रमांना प्राधान्य देणार आहेत.दरम्यान, अक्षय तृतीयेला पूजेसाठी लागणारी मातीची घागर, डांगर यांना चांगली मागणी होती. आंब्यांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली होती. सकाळी संचारबंदी शिथील झाल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. काही विक्रेत्यांकडे रांगा लागल्या होत्या. आवक कमी असल्याने काहींनी भाव देखील वाढविले होते.
अक्षय तृतीयेचा अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:33 PM