नंदुरबार : जिल्ह्यातील तापी पट्ट्याच्या भागात शुक्रवारी अर्धा ते पाऊण तास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा व दादर पिकाला फटका बसणार आहे. दरम्यान, ३ मार्चपर्यंत हवामान विभागाने तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. दिवसभरात जिल्हाभरात ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी अनेक भागात हलक्या सरी कोसळल्या.
दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास मात्र तापी पट्ट्यातील अनेक भागात अर्धा ते पाऊण तास पावसाने हजेरी लावली. काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, दादर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय केळी व पपईलाही फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. आणखी दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.