लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एखाद्याला अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक कागदपत्रे देणे किती धोक्याचे ठरु शकते याचा अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतक-याला आला आहे. अज्ञात व्यक्तीने या पॅनकार्डचा वापर करत बनावट कंपनी स्थापन करुन १४ कोटी रूपयांचा जीएसटी थकवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार शेतकरी खांडबारा ता. नवापूर येथील रहिवासी असून या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, सतीष रावजी पाडवी रा. खांडबारा यांना काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील जीएसटी कार्यालयातील अधिकारी भेटण्यासाठी आले होते. संबधित अधिका-यांनी सतीष पाडवी यांची चाैकशी केल्यानंतर अधिका-यांनी त्यांना अटक करुन औरंगाबाद येथे नेले होते. त्याठिकाणी पाडवी हे कुमकुम टेक्सटाईल नावाच्या कंपनीत समाविष्ट असून त्या कंपनीने १४ कोटी ७१ लाख रूपयांचा जीएसटी थकवल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले. शेतकरी असलेले पाडवी यांनी कधीही एवढ्या मोठ्या रकमेचा आकडा ऐकला नसल्याने त्यांना भोवळच आली होती. त्यांनी गावाकडची जमिन व इतर माहिती दिल्यानंतर अधिका-यांना त्यांच्या पॅनकार्डचा वापर करुन ही फसवणूक करण्यात आल्याचे समजून आल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले. दरम्यान याप्रकरणी सतीष पाडवी यांनी बुधवारी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करत आहेत.
मालेगाव येथील कंपनी असल्याचा दावा
शेतकरी सतीष पाडवी यांची फसवणूक करणा-या अज्ञात व्यक्तीने पॅनकार्डचा वापर करत हा प्रकार केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस केलेल्या प्राथमिक तपासात कुमकुम टेक्सटाईल ही कंपनी स्थापन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कंपनी मालेगाव येथील असल्याची माहिती आहे. शेतकरी पाडवी यांची खांडबारा परिसरात शेती असून ते अल्पभूधारक असल्याची माहिती देण्यात आली आहे.