शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा लम्पी या त्वचा आजारापासून बचाव व्हावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शहादा तालुक्यात लसीकरण राबविण्यात येत आहे. लम्पी त्वचारोग हा विषाणूजन्य असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावरांना होतो. यामुळे जनावरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कळंबू येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावातील पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लम्पी रोगाबद्दल घ्यावयाच्या खबरदारीबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणासाठी पशुधन पर्यवेक्षक एस.एस. गावित, नितीन बिराजदार, योगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
जनावरांना होणारा लम्पी त्वचारोग हा विषाणूजन्य आजार आहे. बाधित जनावरांची लाळ, चारा, गोचीड गोमाश्या, डास यामुळे प्रसार होतो. पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना न घाबरता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून रोगाची बाधा जनावरांना होणारा नाही, असे शहादा येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सागर परदेशी यांनी सांगितले.