मोदलपाडा : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्री करताना आढळल्यास 21 हजार रुपयांचा दंड करण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.प्रजासत्ताकदिनी वाण्याविहीर ग्रुपग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जि.प.चे माजी सदस्य संतोष पाडवी, माजी उपसरपंच कथ्थूराम सैंदाणे, सामा महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शासनाने ग्रामसभेला व्यापक अधिकार प्रदान केले असून आजच्या ग्रामसभेत सरपंच अशोक पाडवी यांनी गावात संपूर्ण देशी, विदेशी व हातभट्टीची गावठी दारूबंदी तसेच गांजा व ताडी बंदीचा निर्णय सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील शेकडो महिला, ग्रामस्थ व तरूण उपस्थित होते. आजपासून गावात कोणी अशा प्रकारचा अवैध धंदा करताना आढळून आल्यास त्याला 21 हजार रुपये दंड देण्यात येणार असल्याचे सरपंच अशोक पाडवी यांनी सांगितले. या निर्णयाचे उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत केले. सध्या तरूणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण खूपच वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक कुटुंब आर्थिकदृष्टय़ा संकटात सापडले आहेत. गावात अतिशय क्षुल्लक कारणाने भांडणे वाढतात. दारुबंदीच्या निर्णयामुळे या सर्व विपरीत गोष्टींवर आळा बसणार आहे. वाण्याविहीर हे गाव अक्कलकुवा तालुक्यातील एक मोठे व्यापारी गाव आहे. या निर्णयाचे संपूर्ण गावक:यांनीही स्वागत केले.कथूराम सैंदाणे, संतोष पाडवी, सामा महाराज, शशिकांत नाईक यांनी दारूबंदीसंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी गावक:यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी माजी सरपंच टेटग्या नाईक, हरिदास गोसावी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे वाण्याविहीर बीट हवालदार शशिकांत नाईक, श्यामराव सोनवणे, विपुल नाईक, विजय वळवी, जहागू पाडवी, प्रदीप पाडवी, राहुल क्षत्रिय, राकेश शिंदे, राजू लोहार, सुदाम चित्ते, संतोष मराठे, संतोष बिरारे, नवनीत सामुद्रे, सचिन परदेशी, तलाठी साळवे, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाण्याविहीर ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय : दारू विक्री करणा:याला 21 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:22 PM