सारंगखेडा-कहाटूळ ते लोंढरे-उजळोद- न्यू असलोद या सुमारे १८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाला २ जुलै २०१८ पासून कामाला आरंभ करण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाची अंदाजपत्रकीय किंमत ८९२.१५ लाख रुपये होती. तसेच ठेकेदारामार्फत देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षांचा आहे; परंतु हा रस्ता तीनच वर्षांत निकामी होण्याच्या मार्गावर आहे. सारंगखेडा ते कहाटूळ रस्ता मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते; परंतु सद्य:स्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था पाहता हा रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील वाहनधारक व शेतकरी करीत आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. ठेकेदाराने नुसती नावापुरती दुरुस्ती न करता किमान पाच वर्षे रस्ता सुस्थितीत असावा, अशाप्रकारे दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत.
सारंगखेडा-कहाटूळ रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:33 AM