लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्री तपासण्यात आली असून रुग्ण २८ मार्च रोजी उच्छल व वापी येथील नातेवाईकांसोबत सुरत येथे गेला होता. त्यानंतर नंदुरबारातच थांबून होता असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले आहे.रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यास लागलीच त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती आणि त्याने कुठे प्रवास केला, कुठे त्याला लागण झाली असेल याची माहिती काढली जाते. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी जारी केलेल्या आॅडिओ संदेशात संसर्गीत रुग्ण २८ मार्च रोजी उच्छल, वापी येथील नातेवाईकांसोबत सुरत येथे २८ मार्च रोजी गेला होता. त्यानंतर नंदुरबार येथे परत आल्यावर घरीच थांबून होता.चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णाला होत असलेल्या त्रासाचे निदान करून त्यांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अहवाल आल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्री फारशी मोठी नसल्यामुळे कोरोनाची लागन कुठून झाली असेल याची माहिती घेण्यात आरोग्य विभाग आता कामाला लागला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सत्य माहिती जाणून घ्यावी. अधिकी माहितीसाठी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्रीची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:29 PM