मनोज शेलार
नंदुरबार : जिल्हा परिषदेचा आखाडा पुन्हा गाजणार आहे. ११ गट व १४ गणांसाठी निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. जुलै महिन्यात ज्या टप्प्यावर निवडणूक स्थगित झाली होती, त्या टप्प्यापासून पुढे ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे लढतींचे बरेचसे चित्र जवळपास स्पष्टच आहे. आता राहिला प्रश्न काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी आघाडीचा. प्राथमिक स्तरावर त्याबाबत बोलणे झालेले आहेच. आता त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे, परंतु मधल्या काळात काँग्रेस व सेनेतील कटुता पाहता काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागून आहे. ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या ११ सदस्यांचे तर नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा पंचायत समितीअंतर्गत १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. संबंधित सदस्य निवडून आलेल्या जागा, अर्थात गट व गण हे सर्वसाधारण झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी रस्सीखेच असल्याचे दाखल अर्जांवरून दिसून येते. सर्वाधिक लक्ष हे कोळदा, कोपर्ली, खापर, म्हसावद, लोणखेडा या गटांकडे राहणार आहे. कोळदा गटात माजी मंत्री यांची कन्या तर खासदारांची भगिनी डॉ.सुप्रिया गावीत, कोपर्ली गटात माजी आमदारांचे पुत्र तथा माजी जि.प. उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, लोणखेडा गटात माजी जि.प. उपाध्यक्ष यांच्या पत्नी तथा माजी सभापती जयश्री पाटील, म्हसावद गटात माजी जि.प. सभापती डॉ.भगवान पाटील, खापर गटात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी असे दिग्गज उमेदवार उभे आहेत. त्यांच्यासमोर विरोधी पक्षानेही सक्षम उमेदवार दिले असल्याने, या लढती रंगतदार व लक्षवेधी ठरणार आहेत. राजकीय नेत्यांना आपल्या वारसांना किंवा घरातील मंडळींना पुढे आणायचे आहे. त्यासाठी त्यांचा आटापिटा राहणार आहे.
गणांचा विचार केला, तर सर्वाधिक गणांच्या निवडणुका या शहादा पंचायत समितीअंतर्गत आहे. या ठिकाणी एकूण आठ गणांसाठी निवडणूक होणार आहे. सद्या या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. एकूण २८ जागांमध्ये १४ जागा या भाजपकडे, १२ जागा या काँग्रेसकडे तर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी व माकपकडे होती. त्यामुळे या आठ गणांच्या निकालाचा परिणाम येथील सत्तेवर होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
नंदुरबार पंचायत समितीअंतर्गत सहा गण आहेत. नंदुरबार पंचायत समितीवरही भाजपचीच सत्ता आहे. एकूण २० जागा असून, भाजपचे ११, शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे तीन तर एक अपक्ष असे येथे पक्षीय बलाबल होते. त्यामुळे येथेही या सहा गटातील निकालाचा परिणाम सत्ता पालटवर होईल, याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलकुवा पंचायत समितीअंतर्गत एकमेव कोराई गण आहे.
निवडणुकीच्या प्रक्रियेत माघारीची मुदत बाकी आहे. माघारीअंती बरेचसे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी मात्र राज्यात सरकारमध्ये असलेले काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी हे आघाडीचा धर्म पाळणार किंवा कसे, याकडे लक्ष लागून आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या वेळी तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली होती. दुसऱ्या बैठकीत एक पक्ष सहभागी झाला नव्हता. त्यातच मधल्या काळात काँग्रेस व सेनेत बरीच कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळला जातो की, तिन्ही पक्ष एकमेकासंमोर उमेदवार देतात, याकडेही पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. २१ सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. २७ रोजी माघारीची मुदत आहे. असे असले, तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गट व गणातील गावांमध्ये विविध विकासकामे मंजुरीसाठी पत्र देण्याचा सपाटा नेत्यांनी सुरू केला आहे. आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. जशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे अनेक किस्से व घडामोडी घडणार असून, नंदुरबार व शहादा तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.