मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते 1995 र्पयत काँग्रेसच्या वर्चस्वाखाली राहणारा मतदारसंघ 1995 च्या निवडणुकीपासून काँग्रेसपासून दुरावला आहे. एक वेळा अपक्ष, तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस व एक वेळा भाजपमधून निवडून येणा:या डॉ.विजयकुमार गावीत यांचे वर्चस्व गेल्या 25 वर्षात राहिले आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. युती झाल्यास मतदारसंघ भाजपकडे राहतो किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची उमेदवारी कुठल्या पक्षाकडून राहील यावर लढतीचे गणित अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या वाटय़ाला आला किंवा नाही आला तरी काँग्रेस नवीन व तरुण चेह:याला सपोर्ट करेल ही चर्चा सध्या रंगत आहे. नंदुरबार विधानसभा मतदार संघ पूर्वीपासून एस.टी.प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदारसंघात 1962 पासून काँग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत. अगदी चौथी पास ते प्राध्यापक र्पयतचे आमदार या मतदारसंघाने पाहिले आहेत. 1995 ची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली. तेंव्हापासून या मतदारसंघात परिवर्तन झाले आणि डॉ.विजयकुमार गावीत यांनी एकहाती वर्चस्व मतदारसंघावर कायम ठेवले. 2014 च्या निवडणुकीत आमदार डॉ.गावीत यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत भगवा ङोंडा हाती घेत भाजपममध्ये प्रवेश केला. युती व आघाडी नसलेल्या या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार कुणाल वसावे यांचा 27 हजार मतांनी पराभव केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या डॉ.हिना गावीत यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात तब्बल 70 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा मतदारसंघ सोयीचा गणला जात आहे. परंतु युती झाल्यास शिवसेनेच्या वाटय़ाला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का? हा प्रश्न आहे. डॉ.विजयकुमार गावीत यांना टक्कर देवू शकेल असा सक्षम उमेदवाराची सध्या विरोधकांकडून शोधाशोध सुरू आहे. आघाडी जवळपास निश्चित आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. परंतु राष्ट्रवादीची मतदारसंघातील खस्ता हालात लक्षात घेता काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी टक्कर देण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राजेश वळवी यांचे नाव सध्या चर्चेत आहे.
युतीच्या निर्णयावर अवलंबून : भाजप, सेना युतीचे घोडे सध्या अडले आहे. आघाडी जवळपास निश्चित असली तरी राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही, कार्यकत्र्याची सक्षम फळी नाही. युती झाल्यास मतदारसंघ भाजपला सुटेल किंवा कसे यावर डॉ.गावीतांची उमेदवारी अवलंबून राहील. लोकसभा निवडणुकीत 70 हजाराची आघाडी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या डॉ.हिना गावीत यांना तब्बल 70 हजार 282 मतांची आघाडी मिळाली आहे. एकुण 96 हजाराच्या आघाडीत निव्वळ 70 हजार मते नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील होते. त्यामुळे या मतदारसंघात डॉ.विजयकुमार गावीत यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्या बळावर शिवसेनेकडून भाजप हा मतदारसंघ मागून घेण्याची शक्यता आहे. अर्थात युती होण्याच्या निर्णयावर हे अवलंबून राहणार आहे. त्या काळात आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शस्त्रक्रियेनिमित्त वर्षभरापासून मतदारसंघाच्या संपर्कात नव्हते. आता ते पुर्णपणे सक्रीय आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते पुर्ण तयारीनिशी उतरून रणनिती आखणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे आघाडीमध्ये हा मतदारसंघ कुणाच्याही वाटय़ाला गेला तरी आमदार रघुवंशी पुरस्कृत उमेवाराच डॉ.विजयकुमार गावीत यांना कडवी लढत देईल हे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने आमदार रघुवंशी यांनी तरुण, शिक्षित आणि लोकांमध्ये राहणारा चेहरा असलेल्या एक, दोन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपमधील अंतर्गत धूसफूस.. : भाजपमध्ये इनकमिंग जोरात झाले असले तरी जुने, नवे हा संघर्ष कायम आहेच. लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष उघड पहावयास मिळाला. त्यानंतर संघटनात्मक बदलात खासदार डॉ.हिना गावीत यांच्याकडील जिल्हाध्यक्षपद काढून घेत विजय चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक व त्यापूर्वी दुरावलेले जुने पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जवळ करण्यात डॉ.विजयकुमार गावीत यांना यश येत आहे. असे असले तरी सावध राहणे आवश्यक ठरणार आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे मताधिक्य कायम राहते किंवा कसे हे येणारा काळाच ठरवेल. पुनर्रचनेनंतर.. : 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती. त्यात नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भाग नवापूरला जोडून शहादा तालुक्यातील चार मंडळ नंदुरबार मतदारसंघाला जोडण्यात आले. परिणामी शाहू मतदारांची संख्या या संघात वाढली. त्यामुळे निवडणुकीचे गणित तेंव्हापासून काहीसे दोलायमान राहू लागले आहे.
कॉँग्रेस वर्चस्वाला छेद
नंदुरबार मतदार संघ स्थापनेपासून तब्बल 33 वर्ष काँग्रेसकडे राहिला आहे. काँग्रेस जो उमेदवार देईल तो डोळेझाकून निवडून येत होता. त्यामुळे काँग्रेसचे येथे एकहाती वर्चस्व होते. 1995 मध्ये काँग्रेस विरोधकांनी अपक्ष उमेदवार डॉ. विजयकुमार गावीत यांना पुढे आणले. काँग्रेस अर्थात कै.बटेसिंग रघुवंशी गट एका बाजुला आणि सर्व विरोधक एका बाजुला असे चित्र होते. तेंव्हा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार प्रताप रुपजी वळवी यांचा 19 हजार 578 मतांनी पराभव करीत परिवर्तन केले होते. 1999 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत यांनी राष्ट्रवादीची साथ धरली. 1999, 2004 व 2009 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढविली. या काळात त्यांनी एक टर्म जि.प.ही ताब्यात घेतली.गेल्या 25 वर्षापासून आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे या मतदारसंघात वर्चस्व असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था मात्र काँग्रेसकडेच राहिल्या आहेत. नंदुरबार नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ, काही अपवाद वगळता पंचायत समितीही काँग्रेसडेच राहिली. त्यामुळे आमदारकी गावीत गटाकडे आणि स्थानिक संस्था रघुवंशी गटाकडे राहिल्या.
2014च्या निवडणुकीत मिळालेली मते
होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या 15 हजार 119 इतकी वाढली. 2014 च्या निवडणुकीत मतदार संघात एकुण 3 लाख 11 हजार,791 मतदार होते. यापैकी पुरुष 1,58,716 तर स्त्री 1,53,070 अशी वर्गवारी होती. 2019 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या 26,834 इतकी वाढली असून यात स्त्री मतदारांची वाढ 15,119 इतकी आहे. या निवडणुकीसाठी 3,38,625 मतदारांची नोंद झाली असून, पुरुष 1,70,424 तर महिला मतदार 1,68,189 आहे. वाढीव मतदार हे युवा आहे.