लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उपचारासाठी येणाऱ्या मर्यादा या बाबी लक्षात घेता आता ग्रामिण भागातील नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. विनाकारण शहरी भागात येण्याचे टाळावे. सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन करावे असे आवाहन महाराष्टÑ आदिवासी डॉक्टर असोसिएशनतर्फे पत्रकान्वये करण्यात आले आहे.याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांनी आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरी भागातून आता ग्रामिण भागात शिरकाव होऊ लागला आहे. वाढती संख्या आणि उपचारांसाठी येणाºया मर्यादा लक्षात घेता ग्रामिण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्टÑ आदिवासी डॉक्टर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. शहरात काही महत्त्वाचे काम असले तरच यावे. तालुका मुख्यालयी विनाकारण येण्याचे टाळावे. दवाखाना, शेतीची कामे असल्यास एकाच वेळी ही कामे होतील या दृष्टीने नियोजन करावे. गावात, परिसरात नेहमीच मास्कचा वापर करावा. भाजीपाला व किराणा आपल्या जवळच्या दुकातूनच घ्यावा. इतर ठिकाणी पाहुणचार टाळावा. गावातील सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामस्थांचे समुपदेशन करावे व जनजागृतीवर भर द्यावा. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, तोंडाला चव नसणे अशी लक्षणे आढळल्यास लागलीच जवळच्या सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी जावे. राज्यातील अनेक भागात सरकारी व खाजगी दवाखान्यांमध्ये जागा मिळत नाही. जर जिल्ह्यातील ग्रामिण भागात याचा फैलाव झाला तर परिस्थिती हाताळणे मोठे आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहनही महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनने पत्रकात म्हटले आहे.कोरोनाचा फैलाव ग्रामिण भागात होऊ नये यासाठी प्रशासन उपायोजना करीत आहेत.परंतु आदिवासी डॉक्टर असोसिएशन देखील जनजागृतीवर भर देत आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ.राजेश वळवी, अध्यक्ष, आदिवासी डॉक्टर असोसिएशन.
ग्रामिण भागात सतर्कता आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:44 PM