लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा ग्रामपंचायतीत गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्त असलेले ग्रामविकास अधिकारी एस.आर. कोळी यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबित केल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास अधिकारी एस.आर. कोळी यांची काही महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या प्रशासक काळातील अनेक तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशी समितीसमोर ग्रामविकास अधिकारी एस.आर. कोळी उपस्थित न राहिल्याने त्यांच्या काळातील ग्रामपंचायतीचे दप्तर चौकशी समितीला न दाखवल्यामुळे ग्रामविकास अधिकारी चौकशी समितीसमोर उपस्थित राहिले नाहीत. चौकशी समितीला त्यांच्या काळातील दप्तर चौकशीसाठी न मिळाल्याचा अहवाल चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्या अहवालानुसार या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ८ जुलै २०२० रोजी ग्रामविकास अधिकारी कोळी यांना निलंबित केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. कोळी यांच्याकडे तालुक्यातील वेली, बोखाडी, बेडाकुंड या ग्रामपंचायतीदेखील असून अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा कारभारही त्यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. अक्कलकुवा येथील प्रशासक काळातील तक्रारींच्या चौकशीकामी ते हजर न राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अक्कलकुव्याचे ग्रामविकास अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:55 AM