लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रकाशा व लोणखेडा ता. शहादा येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवक यांना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी ,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रकाशा व लोणखेडा या दोन ग्रामपंचायतीची माझी वसुंधरा अभियानात निवड करण्यात आली आहे. अभियानात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमांची अंमलबजावणी व व्यवस्थापन या बाबींसाठी एक हजार गुण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती ना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अभियानाचे नोडल ऑफिसर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत उपस्थितांना बनवडी ता. कराड जि. सातारा येथील ग्राम विकास अधिकारी दिपक हेळुंके यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापनामुळे शाश्वत स्वच्छता राहण्यास कशी मदत होते व त्यातून ग्रामपंचायतीस कशाप्रकारे उत्पन्न मिळते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक येथील ग्राम विकास अधिकारी जी.आर .आढाव यांनी वृक्ष लागवड ,त्यांचे संवर्धन व भविष्यात यातून ग्रामपंचायतीस मिळणारे उत्पन्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.वर्षा फडोळ यांनी केले यावेळी गटविकास अधिकारी आर .बी. घोरपडे ,विस्तार अधिकारी (पंचायत) सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
शाश्वत स्वच्छतेवर गावांनी भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 11:37 AM