लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : युवकाच्या खून प्रकरणाला बुधवारी दुपारी हिंसक वळण लागून जमावाने अनेक घरांवर दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. दिवसभर शहरात अघोषीत संचारबंदी होती. अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री पोलीस वसाहतीतील रवींद्र सोमा मोरे (25) रा.नवीन पोलीस वसाहत या युवकाचा चार युवकांनी खून केला होता. या प्रकरणी बुधवारी संतप्त झालेल्या जमावाने साक्रीनाका, चौधरी गल्ली, बागवान गल्ली परिसरात तुफान दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. जमावाकडून दोन चारचाकी वाहने जाळण्यात आली तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दहा ते 12 दुचाकींचेही नुकसान केले. अनेक घरांवर दगडफेक करीत नुकसान केले.या घटनेमुळे शहरात अघोषीत संचारबंदी सदृष्य स्थिती निर्माण झाली. सायंकाळर्पयत मुख्य बाजारपेठेसह सर्वच भागात शुकशुकाट होता. पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैणात केला आहे. याप्रकरणी सायंकाळी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नंदुरबारात युवकाच्या खून प्रकरणाला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 4:28 PM