लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकतर्फी प्रेमातून युवकाने युवतीचे लग्न मोडून तिच्या होणाऱ्या पतीला आणि नातेवाईकांना बनावट अश्लिल छायाचित्रे पाठविल्याची घटना शहादा येथे घडली. युवतीच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध शहादा पोलिसात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमद सलीम इसाणी (१८) रा.मेमन कॉलनी, शहादा असे संशयीत तरुणाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, अहमद सलीम इसाणी हा त्याच भागात राहणाºया एका महाविद्यालयीन युवतीवर एकतर्फी प्रेम करीत होता. शाळेत जातांना व येतांना तिचा पाठलाग करणे, पाठीमागून तिचे मोबाईलवर फोटो काढणे, अश्लिल शेरेबाजी करणे असे प्रकार करीत होता. युवतीने त्याला विरोध केला असता त्याने माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे लग्न होऊ देणार नाही आणि घरच्या लोकांनाही मारून टाकेल अशी धमकी देत होता. या दरम्यान युवतीचे लग्न सुरत येथील युवकाशी ठरले. तिचा साखरपुडा देखील झाला. ही बाब अहमद इसाणी याला समजल्यावर त्याने युवतीच्या भावी पतीचे इंस्टाग्राम अकाऊंट मिळविले. त्यावर युवतीचे कॉलेजमधील गृप फोटो आणि इतर फोटो काढून घेत त्याच्याशी छेडछाड करून अश्लिल फोटो व व्हिडीओ क्लिप तयार करून ते इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकले. शिवाय इतर नातेवाईकांनाही ते फोटो सोशल मिडियाद्वारे पाठविले. युवतीच्या भावी पतीला धमकी देवून लग्न न करण्याचे सांगितले. त्यामुळे युवतीचे लग्न मोडले. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून अहमद सलीम इसाणी याच्याविरुद्धे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लागलीच अटक केली असून तपास पोलीस निरक्षक किसन नजन करीत आहे.
युवतीचे अश्लिल फोटो तयार करून केले व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 11:51 AM