लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे बस स्थानक परिसरात काही गायी महामार्गाच्या बाजूला बसलेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीरात्री अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने त्याच्या ताब्यातील वाहन चालून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या गाईंना अक्षरशहा चिरडले.या गंभीर अपघातात दोन गर्भवती गाईंना जास्त मार लागल्यामुळे त्या गाई ठार झाल्या आहेत तर तीन गायी व दोन वासरे अद्यापही गंभीर जखमी अवस्थेत आहेत. रात्री विसरवाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे पो.कॉ. अनिल राठोड, दिलीप गावित हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच विसरवाडी येथील किरण समुद्रे, समीर खाटीक, सचिन जाधव अतुल गावित या युवकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायींना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्यावर औषधोपचार केला.याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अनिस बशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राण्यांना कृतीने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप गावित करीत आहे.दरम्यान, महामार्गावर भरधाव वाहने जात असतात. रस्त्यांची अवस्था खराब असल्याने रस्त्याच्या बाजुने वाहने चालविण्याचे प्रकार देखील वाढले आहे. त्याचमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विसरवाडी गावाच्या हद्दीत ठिकठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे.
अपघातात गायींच्या मृत्यूने विसरवाडीकर हळहळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 12:34 PM