कोरोनाची लाट आता सावरल्याने शासनाने अटी व शर्तींच्या अधीन राहून इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील विविध शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने गजबजू लागल्या आहेत. विद्यार्थी येण्याअगोदर वर्गखोल्या व परिसर सॅनिटाईज करण्यात आले. दीड वर्षाच्या खंडानंतर प्रथम विद्यार्थी शाळेत दाखल झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षकांनी ही प्रत्यक्ष फळ्यावर ज्ञानदान केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
विद्यार्थ्यांचे स्वागत
दीर्घ काळापासून विद्यार्थ्यांपासून पोरक्या असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा गजबजू लागल्या आहेत. शहरातील व्ही.के. शहा विद्यालय व जी.एफ. पाटील विद्यालयात पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे थर्मल गणने तापमान मोजण्यात आले. या वेळी उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षक आय.एन. चौधरी उपस्थित होते. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी उपस्थिती होती. शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना कोविड नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी शाळेत येताना मास्क परिधान करूनच यावे, स्वतःची पाण्याची बॉटल व सॅनिटायझर बॉटल सोबत आणावी. पालकांनी विद्यार्थ्यास सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे दिसत असतील तर शाळेत पाठवण्याची आवश्यकता नाही. -प्राचार्य आय.डी. पाटील