लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्या त्या विधानसभा मतदारसंघनिहाय तहसील कार्यालयात नागरिकांना मतदार यादी पहाण्यासाठी उपलब्ध आहे. दरम्यान, एकुण मतदार आणि वाढलेले मतदार याची माहिती चार ते पाच दिवसात स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून अंतिम मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार मतदारांना आपले नाव आहे किंवा नाही. पत्ता व मतदार भाग यादी बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी मतदार याद्या विधानसभा मतदारसंघ निहाय त्या त्या तहसील कार्यालयात व मतदान केंद्रांवर पहाण्यासाठी उलपब्ध आहेत. यापूर्वी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावर आलेले आक्षेप आणि हरकती निकालात काढून आता अंतिम याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.दरम्यान, जिल्ह्यात एकुण मतदार, वाढलेले मतदार आणि स्त्री, पुरुष मतदार यांची एकत्रीत आकडेवारी येत्या चार ते पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे यासंदर्भात येथे माहिती प्राप्त झाल्यावरच अधिकृत आकडा कळणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात एकुण 12,14,458 मतदार होते. त्यात 06,07,241 पुरुष तर 06,06,905 महिला मतदार होते. आता प्रत्यक्षात किती वाढ झाली हे अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट होणार आहे. नवीन मतदारयादीत 30 ते 35 हजारांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विधानसभेसाठी मतदार यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:41 AM