लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़ 21 : गरोदर मातांना अंगणवाडय़ांमध्ये देण्यात येणा:या अमृत आहार शिजविण्यासाठी तत्काळ गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने महिला बचत गटांना इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र असून, आहार शिजविण्यावरदेखील परिणाम होत आहे. अंगणवाडय़ांनी पुरविण्यात येणारी गॅस सिलिंडर स्थानिक एजन्सीकडूनच उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा बचत गटांनी केली आहे.गरोदर मातांचे सुदृढ आरोग्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षापासून डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. तळोदा तालुक्यातही 242 ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांमार्फत अशा गरोदर मातांना आहाराचा रोज लाभ दिला जातो. अंगणवाडय़ांमधील आहार शिजविण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावानुसार त्या-त्या गावातील महिला बचत गटांना देण्यात आला आहे. शिवाय आहार शिजविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अंगणवाडय़ां ना गॅस सिलिंडरदेखील पुरविण्यात आले आहेत. सिलिंडरचे डबल कलेक्शन देण्यात आले आहे, असे असले तरी हे सिलिंडर तत्काळ मिळत नसल्याने महिला बचत गटांना इंधन म्हणून लाकडाचा वापर करावा लागत असल्याची व्यथा आहे. कारण सिलिंडर संपल्यांनतर लगेच सिलिंडर उपलब्ध होत नाही. आहारावरही त्याचा परिणाम होतअसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेने नंदुरबार येथील गॅस वितरकांना ठेका दिला आहे. त्यामुळे मागणी करूनही वेळेवर सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचा आरोप आहे. तातडीने सिलिंडर देण्याची जबाबदारी संबंधित वितकांची असतांना उलट कनेक्शन स्थानिक वितरकाकडे ट्रान्सफर करून द्या असे बेजबाबदार उत्तर हे वितरक देत असल्याचेही बचत गटातील महिला सांगतात. वास्तविक सिलिंडरचा पुरवठा अंगणवाडय़ांना सुरळीत होत नसल्याची तक्रार महिला बचत गटांच्या महिलांनी अंगणवाडय़ा सेविकांमार्फत तळोदा एकात्मिक बालविकास अधिका:यांच्या मिटिंगमध्ये केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांना सांगितले जात असते. अर्थात प्रकल्प प्रशासनाकडूनदेखील पाठपुरावा केला जात असला तरी त्यांच्याही पत्रास केराची टोपली दाखविली जात आहे. गॅस कनेक्शन दुस:या एजन्सीकडे असल्यामुळे स्थानिक वितरण बचत गटांना सिलिंडर भरून देत नसल्याची व्यथाही महिलांनी व्यक्त केली आहे. अशा वेळी जळाऊ लाकडाचे सरपन गोळा करावे लागत असते. हे सरपन गोळा करतांनादेखील अतिशय कसरत करावी लागते. त्यामुळे या महिलाही अत्यंत वैतागल्या आहेत. एकीकडे शासन या गरोदर महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस, पुरक आहार देण्याचा प्रय} करीत असतांना दुसरीकडे प्रशासन कोणत्या ना कोणत्या प्रकारे यात खोडा घालून एक प्रकारे योजनेलाच हरताळ फासत असल्याचा आरोपही केला जात आहे. शिजवलेला आहार या गरोदर मातांना वेळेवर मिळाला तर सुदृढ राहील. सिलिंडरच्या पुरवठय़ाची अशी स्थिती राहिली तर अंगणवाडय़ा कोणत्या परिस्थितीत वेळेवर आहार देईल असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंगणवाडय़ांना आहार शिजविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सिलिंडरचा पुरवठा केला जात नसला तरी स्थानिक वितरकांकडून पुरवठा होणे अपेक्षित होते. कारण अंगणवाडय़ांकडून मागणी केल्याबरोबर तत्काळ सिलिंडरचा पुरवठा करता येवू शकतो. मात्र पुरवठा नंदुरबार येथील वितरकांना देण्यात आला आहे. सिलिंडर संपल्यानंतर अंगणवाडी सेविका प्रकल्प प्रशासनाकडे मागणी करतात. त्यानंतर पन्रशासन संबंधित वितरकाकडे मागणी करतात. एवढय़ा क्लिस्ट प्रक्रियेमुळे सिलिंडर ताबडतोब मिळणे अशक्य असल्याचे म्हटले जाते, अशी वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सिलिंडर अभावी आहारावर होणारा दुष्परिणामाची दखल घेवून निदान स्थानिक वितरकांमार्फत अंगणवाडय़ांना सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी बचत गटांची मागणी आहे.
तळोद्यात आहार शिजविण्यासाठी सिलिंडरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:23 PM