लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींंचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यातील चार ग्रामपंचायती या सरदारसरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या बधितांच्या आहेत. वर्षानुवर्षे विकासाची प्रतिक्षा असलेल्या या गामपंचायतींमध्ये आजही पायाभूत सुविधांची वानवा आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आजी-माजी सदस्य व पदाधिकारी पॅनल तयार करुन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. नर्मदा नगर, सरदार नगर, रेवानगर, रोजव पुनर्वसन, बंधारा, राणीपुर व पाडळापुर या सात ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने तालुक्यात राजकीय वारे वाहत आहेत. नर्मदानगर, सरदार नगर, रेवानगर व रोझवा पुनर्वसन या सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या वसाहती १९९५ साली स्थापन करण्यात आल्या तर २००५ मध्ये ग्रामपंचायतीत समाविष्ट केल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने येथील इच्छूक उमेदवारांनी देखील हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यातही या ग्रामपंचायतींच्या आजी-माजी ग्राम पंचायत सदस्यांनी एकास एक पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत भरणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. ऐन थंडीच्या मोसमात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापत असल्याने तालुक्याच्या इतर भागातील नागरीकांची उत्सुकता लागून आहे. या वसाहती नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जुन्या वसाहती आहेत. मात्र तेथे अजूनही संपूर्ण पायाभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. कुठे सिमेंट काँक्रिटीकरण नाही तर कुठे भूमिगत गटारी नसल्याचे चित्र आहे. शिवाय शौचालयांच्या प्रश्न देखील कायम आहे. एवढेच नव्हे नर्मदा नगर येथील वसाहतीचे शेतीचे दप्तर गहाळ झालेले आहे. आजही या वसाहतधारकांना शेतीच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हा प्रश्न अजूनही निकाली काढण्यात आलेला नाही. बहुतेक रहिवाशांचा घर प्लॉटचा प्रश्न कायम आहे. त्यांच्या जमिनीच्या सिंचनाच्या प्रश्नही पूर्णपणे सुटलेला नाही. वास्तविक गेल्यावर्षी नर्मदा विकास विभागाने ज्या ९ वसाहतींना २७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. त्यात या वसाहतींच्या ही समावेश होता असे असताना सदर वसाहती प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित आहेत. सध्या दोन ग्रामपंचायती काँगेस तर दोन ग्रामपंचायती भाजपचा ताब्यात आहेत. गेल्या वेळी देखील या ग्राम पंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या वेळी प्रभागात कोण उमेदवार निवडणूक लढवणार याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.
रेवानगर येथील निवडणूकीकडे लक्ष तळोदा तालुक्यातील रेवानगर ग्रामपंचायती त पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी सदस्य यांचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. तशी रणनिती देखील पॅनलप्रमुखांनी तयार केल्याची माहिती देण्यात आली आहे. हे दोघे पदाधिकारी पारंपारीक विरोधक समजले जातात. कारण पंचायत समिती निवडणुकीत ते एकमेकांविरोधात लढले होते. सद्या ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. येथील निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.