नंदुरबार : जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे खरीप हंगामाला ब्रेक लागला असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्याचे समोर आले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्यांना गती मिळाली नसल्याची माहिती देण्यात येत आहे.
जिल्ह्यात यंदा तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस, तसेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी मेपासून सज्ज झाले होते. गेल्या दोन वर्षांत पावसाची समाधानकारक हजेरी राहिल्याने यंदाही पाऊस चांगला येणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकरी क्षेत्रवाढीसाठी उत्सुक होते. परिणामी, जिल्ह्यात २ लाख ८३ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु जून महिन्यात पाऊस न आल्याने पेरण्यांना ब्रेक लागून जिल्ह्यात केवळ १ लाख ११ हजार ५१४ हेक्टरवर पिकांची पेरणी झाल्याचे समोर आले आहे. ही पेरणी निर्धारित क्षेत्राच्या केवळ ३९ टक्के आहे. ऊस पिकासह टक्केवारी ४० टक्के आहे. पावसाअभावी कूपनलिकांना पाणी नसल्याने बागायदारांची कामेही रखडली असून, फळपिकांचे संगोपन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली जात आहे.
दुसरीकडे कापसाचे निर्धारित क्षेत्र यंदा कमी झाले असले तरीही एकूण ४५ टक्के कापूस लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दुबारचे संकट आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
सर्वच तालुक्यांत पेरण्या
जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करणे निर्धारित आहे.
आजअखेरीस जिल्ह्यात १ लाख ११ हजार ५१४ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.
निर्धारित क्षेत्राच्या ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्व सहा तालुक्यांत खरीप पिकांचा पेरा झाला आहे.
तळोद्यात कमी
आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात १७ हजार ९८४, नवापूर ३६,७८१, शहादा १८ हजार ५०२, तळोदा ३ हजार १५५, धडगाव १६ हजार ३२५, तर अक्कलकुवा तालुक्यात १८ हजार ७६७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पेरण्या धडगाव, तर सर्वाधिक कमी १७ टक्के पेरण्या तळोदा तालुक्यात झाल्या आहेत.
सोयाबीन खालावला : पावसाअभावी शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेले साेयाबीन बियाणे घरात पडून आहे. परिणामी, यंदा सोयाबीनचा पेरा जून महिना उजाडूनही ४१ टक्के आहे. आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार ४२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यात सर्वाधिक ७ हजार ७२१ हेक्टर पेरणी ही नवापूर तालुक्यातील आहे.
जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाची सरासरी चांगली असल्याने भागात पेरण्यांना अधिक गती आहे. यातून भात आणि मका पिकांना पसंती आहे. तालुक्यात ६ हजार २३८ हेक्टर भात आणि ३ हजार २४० हेक्टर मका पेरा पूर्ण झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरा करण्यावर भर देतात. यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार केलेले साेयाबीन बियाणे घरातच पडून आहे. असे असतानाही आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी झाली आहे.