या रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे सांगितले जाते. रस्त्यावर खडीही टाकण्यात येते. मात्र काही दिवसांनी टाकलेली खडी उचलण्यात येते. मात्र रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे तोरशाबारी पाड्यावरील नागरिकांच्या पदरी निराशाच येते. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम होत नसल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना अक्षरश: चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. वाहन काढताना चिखलात रूतत असल्याने त्रासदायक होते. या रस्त्यादरम्यान दोन नाले येतात. या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात रस्ताच बंद होतो. पाटीलपाडा येथील अंगणवाडी केंद्रात लहान चिमुकले जातात. मात्र या नाल्यांवर फरशी पूल नसल्याने नाल्याला अचानक पाणी येऊन धोकादायक ठरू शकते. वडफळीपाडा ते तोरशाबारीपाडा या एक किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता तयार करण्याची मागणी रमेश वसावे, महेश वसावे, संजय पाडवी, मिथुन वसावे व ग्रामस्थांनी केली आहे.
रस्ता नसल्याने चिखलातून मार्गक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:32 AM