दामळदा ते खेडदिगर रस्त्यावरुन वाहनांची नेहमी वर्दळ असते. सद्यस्थितीत या रस्त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, मोठमोठ्या खड्ड्यांसह या रस्त्याला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता आहे असे सिद्ध करुन दाखवावे, असे आव्हानच या परिसरातील नागरिकांनी दिले आहे. खेडदिगर गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या. मात्र हा रस्ता आमच्याकडे नाही, असे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केली तर रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे असे उत्तर तेथील अधिकाऱ्यांकडून मिळते. दोन वर्षापासून असाच खेळ सुरू असून संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण आठ दिवसात न झाल्यास परिसरातील जनता रस्त्यावर उतरुन आंदोलन उभारतील, असा इशारा भाजपचे कार्यकर्ते संजय पाटील, मोहन पाटील, कैलास पाटील, विजय चौधरी, दिलीप चौधरी व कांतीलाल पाटील आदींनी दिला आहे.
दामळदा ते खेडदिगर रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:34 AM