नंदुरबार : सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते शेतीसाठी उपयोगात आणण्याची योजना राबविणारी नंदुरबार ही राज्यातील पहिलीच पालिका राहणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील विविध विकास कामांसदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रघुवंशी यांनी सांगितले, नंदुरबार शहरात भूमिगत गटार योजना राबविण्यात आली आहे. यातून निघणारे सांडपाणी हे एका ठिकाणी गोळा करून तेथे त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी सी.टेक.च्या धर्तीवर मल निस:रण केंद्र उभारण्यात आले आहे. दोन भागातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने सांडपाणी नळवा शिवारातील या केंद्रात येणार आहे. त्यासाठी शहरभरात एकूण 145 कि.मी.ची भूमिगत गटार टाकण्यात आली आहे. राज्यभरात केवळ नंदुरबार पालिका हीच एकमेव पालिका अशा प्रकारची योजना राबविणारी ठरणार आहे. आतार्पयत केवळ महापालिकांमध्येच ही योजना राबविण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याअंतर्गत योजनेचे काम सुरू असून पूर्ण झाल्यावर पालिका ती चालविणार आहे.स्व.बाळासाहेबांचे नावनंदुरबार शहरात जलतरण तलाव नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव उद्घाटनानंतर बंदच आहे. खाजगी तत्त्वावर एक सुरू झाला आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात जलतरण तलावाचा लाभ घेता यावा व शहरात उत्तम जलतरणपटू घडावे यासाठी पालिकेतर्फे ऑलंम्पिक खेळाच्या धर्तीवर जलतरण तलावाचे बांधकाम सुरू आहे. या तलावाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. तसा ठरावही पालिकेत करण्यात आला आहे. याशिवाय सी.बी.गार्डनमध्ये मिनी वॉटरपार्कदेखील तयार करण्यात येत आहे.पालिका निवडणुकीची तयारीकाँग्रेसतर्फे पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मार्च अखेर सर्वच विकास कामे पुर्ण करणार आहे. मुख्यमंत्रीसह इतर मंत्री, नेतेगण यांच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटने करण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यापासून प्रत्यक्षात निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. विरोधक कोण राहील, कसा राहील याची कल्पना नाही. परंतु शहरवासीयांच्या विश्वासावर, बळावर आपण या निवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचेही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
सांडपाणी शुद्धीकरणाची योजना आकारास
By admin | Published: February 15, 2017 11:10 PM