नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या प्रकल्पात अवघा 21 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय याच नदीवरील व विरचक प्रकल्पाच्या अलीकडील आंबेबारा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. परंतु या धरणातून शहराच्या एकूण पाणी पुरवठय़ापैकी केवळ 20 टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी दरवर्षी पालिका या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षित करीत असते.साठा घटतोय..विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. फेब्रुवारी महिन्यार्पयत या प्रकल्पात 50 टक्केर्पयत पाणीसाठा होता. परंतु यंदा तीव्र उन्हाळा असल्यामुळे आणि तापमानदेखील 40 पेक्षा अधिकच राहिल्याने पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाणी साठय़ात या तीन महिन्यात अर्थात मार्च ते मे दरम्यान घट झाली. सद्य स्थितीत जिवंत पाणीसाठा केवळ 15 टक्के असून त्यानंतर मृतसाठा राहणार आहे. परंतु तोर्पयत दमदार पाऊस झाल्यास ब:याच प्रमाणात समस्या मिटणार आहे. सध्या जून महिना अर्धा संपला आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पाण्याची नासाडीशहरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्याचे मोल जनतेला कळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी भरल्यानंतर थेट गटारीत नळी सोडणे, झाडांना पाणी मारणे, टाकी भरूनही कॉक बंद न करणे, अंगणात, रस्त्यांवर पाणी शिंपडणे असे प्रकार होत आहेत. शिवाय अनेक भागातील नळांना तोटय़ा नसल्यामुळे पाणी पुरवठय़ाच्या कालावधित सर्रास पाणी वाहत असते. त्याबाबत पालिकेने वेळोवेळी जनजागृती करूनही उपयोग झाला नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे ज्या भागातील नळांना तोटय़ा नाहीत अशा भागातील नागरिकांना, नळधारकांना मोफत तोटय़ा पुरविण्यात आल्या होत्या, परंतु त्याचाही उपयोग जनतेने करून घेतला नाही.
नंदुरबारात पाणी कपातीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:49 PM