शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविले जाते आणि हे पाणी पिकांना सिंचनासाठी वापरले जाते. निक्रा प्रकल्पांतर्गत लोकांच्या सहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले. या पाण्याचा उपयोग हरभरा, तूर, भाजीपाला यासारख्या पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी होतो. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षमपणे करण्यासाठी रेनपाइप सिंचनप्रणालीचा वापर होत आहे. हे वनराई बंधारे बांधण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा उपयोग केला जातो. हे बंधारे बांधण्यासाठी नाल्यातील जागांची निश्चिती कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाने सुचविण्यात आल्या होत्या. त्या सर्व ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यासाठी रिकाम्या गोण्यांचा वापर करण्यात आला. गोण्यांमध्ये नदीपात्रातील रेती भरली जाते आणि त्याच्या दोन ओळी आडव्या टाकल्या जातात. त्या ओळीमध्ये चिकणमाती भरावी लागते. अशापद्धतीने कमी खर्चात वनराई बंधारे बांधता येतात. वनराई बंधारे साखळीपद्धतीने बांधल्यास नदी व नाल्याच्या पात्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होतो. वनराई बंधारे हे अत्यंत कमी खर्चिक असलेली पद्धत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, अरुण कदम यांनी मार्गदर्शन केले. भुजगाव येथील छोटूलाल पावरा, रमेश पावरा, विजय पावरा, किसन भिल, शंकर भिल, चमाऱ्या भिल, लेहेऱ्या पावरा यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या सहभागाने बंधारे बांधले आहेत.
धडगाव परिसरात लोकसहभागातून जलसमृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:26 AM