लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग इंच ना इंच जमिनीसाठी करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाऊस हे समिकरण मान्य केले तर नैसर्गिक प्रवाहातून येणारे पाणी त्या त्या ठिकाणी बांध घालून जमिनीत जिरवले पाहिजे असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलसाक्षरता सभेत बोलतांना केले.जिल्हा साक्षरता समिती, यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलसाक्षरता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.राजेंद्रसिंह बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, यशदाचे डॉ.सुमंत पांडे आदी उपस्थित होते.डॉ.राजेंद्रसिंह म्हणाले, प्रत्येकाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करणारी परिवर्तनवादी लोकचळवळ निर्माण करून पावसाचा पडणारा थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे या दृष्टीने प्रत्येकाने प्रय} करण्याची गरज आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे या माध्यमातून समुद्राला जावून मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. पूर्वीच्या काळी नद्या, नाले बारमाही वाहत होते. त्यामुळे पाणी अडविण्याची गरज राहत नव्हती. आता मात्र बारा महिन्यांपैकी अवघे दोन ते तीन महिनेच नद्या वाहतात. त्यामुळे मोठमोठे धरण, बंधारे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु एवढी मोठी धरणे आणि बंधारे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे बांधून त्यातून सिंचन वळविल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय असे पाणी जमिनीत मुरण्यास देखील मदत होते. परिणामी जमिनीतील पाणी पातळी वाढते. राज्यासह जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काही भाग चांगल्या पावसाचा तर काही भाग कमी पावसाचा आहे. त्याला कारण मानवनिर्मित संकटेच आहेत. पाण्याचा अधीक उपसा, कमी झालेली वनराई, लहान, लहान बांधांची कमी झालेली संख्या आणि पावसाचा पाण्याचा उपयोग न करण्याचे धोरण ही कारणे प्रामुख्याने नमुद करता येतील असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, जलसाक्षरता योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलदूत, जलनायक, जलप्रेमी व जलकर्मी तयार करावयाचे असून यासाठी शालेय विद्याथ्र्याचा सहभाग आवश्यक राहणार आहे. लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार होतील हा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.जलसाक्षरता केंद्र यशदाचे डॉ.सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता कृती आराखडा, प्रशिक्षण व संनियंत्रण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे माहिती दिली. कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी यांनी यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.
पाणी व्यवस्थापन प्रत्येकाने शिकले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:49 AM