लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. या जिल्ह्यात नंदुरबारचाही समावेश असून हा जिल्हा देशातील सर्वात आदर्श जिल्हा करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवापूर येथे केली.नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, कुवरसिंग वळवी, अनिल वसावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी सांगितले, आपण नवापूर येथे सभा स्वत:हून मागून घेतली. कारण या ठिकाणी आजवर कधीही भाजपचे उमेदवार विजयी झाले नाहीत. परंतु या निवडणुकीपासून परिवर्तन निश्चित होणार असून नवापूूरात भाजपचेच उमेदवार भरत गावीत हे विजयी होऊन येथे प्रथमच कमळ फुलवतील. केंद्राप्रमाणेच राज्यातही एक तृतियांशचे बहुमताचे सरकार निश्चित येणार असून दोन्ही ठिकाणी पक्षाचे सरकार राहिल्यास विकासाला अधीक वेग देता येणार आहे. 1955 मध्ये याबाबतचा अहवाल तेंव्हा च्या सरकारला देण्यात आला होता. त्यात ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार येताच त्यावर विचार झाला व ओबीसींचा सन्मानाच्या योजना सुरू केल्या. मंत्रालयात स्वतंत्र आदिवासी कल्याण विभाग सुरू केला. केंद्रातील आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षापूर्वी जेवढा निधी दिला होता त्याच्या चार पटीने निधी नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात राज्याला दिला आहे. त्यामुळे भाजप सरकारच ख:या अर्थाने समाजातील सर्व घटकांचा विकास करणारे सरकार असल्याने या सरकारचा पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहितीही दिली.
नंदुरबारला आदर्श जिल्हा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:36 AM