नंदुरबार : राज्यातील राजकारण आणि सत्तेबाबत मुंबईत नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे संभ्रमाचे वातावरण असताना शनिवारी राज्याचे शेवटचे टोक असलेल्या शहादा येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी ‘हम साथ है...’चा अनोखा विकेंड घालवला.
राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियांमुळे राजकीय उलट-सुलट चर्चांना उधाण आले असताना शनिवारी मात्र शहादा येथे सर्वपक्षीय नेत्यांचे अनोखा एकोपा पहायला मिळाला. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यक्रमस्थळी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून एकाच गाडीत प्रवास केला, एकाच सोप्यावर बसून दोघांनी नाश्ता केला, कार्यक्रमस्थळीदेखील एकाच सोप्यावर बसून तब्बल तासभर गप्पा केल्या. एवढेच नव्हे तर कार्यक्रमातून मंत्री जयंत पाटील यांना लवकर मुंबईला निघायचे असल्याने कार्यक्रमाचे ते अध्यक्ष असताना प्रोटोकॉल टाळून अगोदर भाषण केले. भाषणानंतर व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची आपुलकीने भेट घेतली. तेवढीच आपुलकी देवेंद्र फडणवीस यांनीही दाखवून एकमेकांच्या हातात हात घेऊन भावपूर्ण निरोप घेतला. हे वातावरण कार्यक्रमस्थळी लक्षवेधी ठरले होते. कार्यक्रमात तीन पक्षाचे तीन मंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन सर्वपक्षीय आमदार, खासदार एकत्र असताना कुठलीही राजकीय टोलेबाजी अथवा विधान झाले नाही. पत्रकारांनी वैयक्तिक संपर्क साधून राज्याच्या राजकारणाबाबत छेडले असता त्यावरही नेत्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे एकूणच राजकीय नेत्यांचा अनोखा ‘हम साथ साथ है...’चा विकेंड जिल्हावासीयांनी अनुभवला.