लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : आईच्या उत्तरकार्यानिमित्त होळमोहिदा, ता.शहादा येथील पाटील परिवारातर्फे रक्तदान, वृक्षारोपण, नेत्रचिकीत्सा शिबिर घेण्यात आले. निसर्ग व समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडून चांगला उपक्रम पाटील परिवाराने घेतल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.होळमोहिदा, ता.शहादा येथील रमेश डायाभाई पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील व राजेंद्र पाटील यांनी आपल्या आई कै.धनाबेन डायाभाई पाटील यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी रक्तदान, वृक्षारोपण, नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार या शिबिरात 117 जणांनी रक्तदान केले तर 141 जणांची नेत्रतपासणी करण्यात येवून डोळ्यांची काय काळजी घ्यावी, औषधोपचार याबाबत नेत्रतज्ञ डॉ.संदेश बागले यांनी मार्गदर्शन केले. वृक्षमित्र जगदीश पाटील यांच्या सहकार्याने पाटील परिवाराचे डॉ.मुकुंद पाटील यांनी आलेल्या नातेवाईकांना व गावात 321 रोपांचे वाटप केले. परिसरात पाटील परिवाराच्या सर्व सदस्यांनी वृक्षारोपण केले. एखाद्या खाजगी उपक्रमात एवढय़ा मोठय़ा संख्येने रक्तदान, नेत्रतपासणी, रोपे वाटप व सहभाग ही विशेष बाब असून होळमोहिदा येथील पाटील परिवाराने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
उत्तरकार्यानिमित्त समाजोपयोगी काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:53 PM