नंदुरबार : : कोरोना नियंत्रणात आल्यानंतर रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे. पॅसेंजर गाड्या सुरू आहेत. नियमित एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत; परंतु पूर्वपदावर आलेली रेल्वे अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पास देण्याचा निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार येथून गुजरात राज्यासह नवापूर, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ याठिकाणी नोकरीनिमित्त अनेक जण जातात. मात्र, त्यांना मासिक पास मिळत नसल्याने नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नोकरदारांना मुंबईत लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांना मासिक रेल्वे पासही उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, उधना-जळगाव मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मात्र पास देण्यात आलेला नाही. यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सुरत-वाराणसी एक्स्प्रेस
चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
उधना-अमरावती पॅसेंजर
सुरत-भुसावळ पॅसेंजर
सुरत-भागलपूर एक्स्प्रेस
नोकरीनिमित्त अमळनेर येथे हावडा एक्स्प्रेसने जावे लागत होते. मासिक पास बंद असल्याने एसटी किंवा इतर वाहनांचा वापर करतो.
- योगेश पवार
प्रवासी
नवापूर एमआयडीसीत कामाला असल्याने रात्रपाळी करून घरी परतण्यासाठी रेल्वे सोयीची आहे. पास बंद असल्याने एसटीने येतो.
- प्रवीण इंदवे
प्रवासी
कामानिमित्त जळगाव व भुसावळ येथे नियमित जाणे होते. रेल्वेचा आधार होता. पास बंद असल्याने तिकीट काढून प्रवास करतो.
- प्रमोद पाटील
प्रवासी