सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या मार्गाचे काम सन २०१७ पासून सुरू आहे. त्या अंतर्गत प्रकाशा ते डामरखेडा यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान नेहमी अपघात होणे, वाहतूक ठप्प होणे या त्रासाला वाहनधारकांसह प्रवासी वैतागले आहेत. ठेकेदार मात्र सुस्त आहे. या कामावर रस्ते विकास महामंडळ नाशिक यांची देखरेख आहे. मात्र, ते अधिकारीदेखील कधी भेट देताना दिसत नाही. या अधिकाऱ्यांनी कधी अडचणी जाणून घेतल्या नाही किंवा समस्यांचे कधी निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. प्रकाशा येथील ग्रामस्थ आता संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार आहेत.
बुधवारी प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी पाऊस झाल्यानंतर पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप झाला. अवजड वाहनांची ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथून डामरखेडापर्यंत व इकडे प्रकाशा येथील बसथांब्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा एकेरी मार्ग सुरू झाला व वाहने निघायला सुरुवात झाली. मात्र, सायंकाळी पाऊस झाल्यानंतर पुन्हा वाहतूक ठप्प झाली. यामध्ये विद्यार्थी प्रवासी अडकून पडले होते. शहादाकडे जाणारे प्रवासी डामरखेडा गावापर्यंत पायी चालत गेले, तर इकडे प्रकाशा बसथांब्यावर दुसरी बस पकडण्यासाठी पायी चालत यावे लागले. या त्रासाला सर्वजण कंटाळले आहेत. मात्र संबंधित ठेकेदार सुस्त आहे.
बुधवारी प्रकाशाहून शहादाकडे एक अवजड वाहन मशिनरी घेऊन जात होते. ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या रस्त्यावरून जात असताना ते उलटून अपघात होईल अशा अवस्थेत थांबले. चालकाने सावधानता बाळगत वाहन बंद केले. एका लोखंडाच्या पाईपने टेका देत वाहनाला आधार दिला. तेव्हापासून वाहतूक ठप्प होण्यास सुरुवात झाली. एका बाजूला काँक्रिटीकरण रस्ता झाला आहे. मात्र, तेथील काँक्रिट सेट न झाल्यामुळे तो रस्ता बंद होता. कच्चा रस्त्यात हे अवजड वाहन बंद पडल्याने वाहनधारक व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. चार तासानंतर पोलीस व संबंधित ठेकेदाराची माणसे आल्यानंतर त्यांनी नवीन रस्त्यावर मातीचा भराव करीत एकेरी मार्गाने वाहतूक सुरू केली. या सर्व प्रकाराला रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप वाहनधारक व प्रकाशा ग्रामस्थांनी केला. २०१७ पासून रस्त्याचे काम सुरू असून संथगतीने काम करण्यात येत आहे. रस्त्यावर नेहमी होणारे अपघात व त्यात अनेकांचे प्राण गेले, तर काहींना अपंगत्व आले आहे. नियमित ये-जा करणाऱ्यांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व घटनांना संबंधित ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारीच जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रकाशा ग्रामस्थांनी शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचा पावित्रा घेतला आहे.
डामरखेड्याचा पूल तोडतोय दम
प्रकाशा व शहादा यांना जोडणारा डामरखेडा गावाजवळील गोमाई नदीवरील पूल अखेरचा श्वास घेत आहे. दिवसेंदिवस या पुलावरील खड्ड्यांचा आकार मोठा होत आहे. यावरून अवजड वाहन गेल्यास पुलाला हादरे बसतात. संरक्षण कठड्यांना तडे जाऊन लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. हा पूल केव्हा कोसळेल याची शाश्वती नसल्याने नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर हाती घेणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.