नंदुरबार : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून येत्या काळात निवडणूक लढवण्याची तयारी आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यास त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नंदुरबार येथे रिपाइंच्या जिल्हा मेळाव्यासाठी आलेल्या आठवले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते.
प्रसंगी रामदास आठवले यांनी देशात २०२४मध्ये नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्त्वात भाजप ४००पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. मोदींचा विकासरथ रोखण्यासाठी निर्माण झालेली इंडिया आघाडी हा रथ रोखू शकत नाही. आंबेडकरी जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आपण शिर्डी येथून, तर आणखी एक उमेदवार विदर्भातून आंबेडकरी जनतेच्या मागणीनुसार भाजपाने दिला पाहिजे, असे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांनी, मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देता येऊ शकते. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. यातून ते मार्ग काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री आठवले यांनी, राम मंदिर हे संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असून, मंदिराचे लोकार्पण हे भाजपाच्या प्रचारासाठी नव्हे तर देशातील लोकांच्या श्रद्धेतून होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुका लागू झाल्यास १२ जागा या भाजपाकडून मिळवून घेणार आहोत. त्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.