ब्राह्मणपुरी : प्रमुख अंतरराज्यमार्ग असणाऱ्या शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळ असणाऱ्या पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने पावसात त्याला तळ्याचे स्वरूप येत असते. हा खड्डा गेले अनेक महिन्यापासून तसाच असल्याने कोणी लक्ष देणार आहे की नाही, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.
कोळदा-खेतिया या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आले होते. यामार्गावरील काम मोठ्या प्रमाणावर पूर्ततेकडे आले असून, सुसरी धरणाच्या वळण रस्त्यावरील काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. प्रत्येक पावसात त्या खड्ड्याचे आकारमान वाढत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार होती त्यामुळे डबके भरून वाहत होते. वाहनधारक, शेतकरी यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य प्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, याच रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची सतत वर्दळ होत असते. निंदान नुसते खड्डे भरून मलमपट्टी तरी करा अशी मागणी वाहनधारकांडून करण्यात येत आहे.
या पुलावरील मोठ्या खड्ड्याबरोबरच सुसरी धरण वळण रस्त्यावर अनेक छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्यांचेही काम होणे आवश्यक आहे. पुलावर तर मोठमोठे खड्डे पडल्याने किरकोळ पावसातदेखील रस्ता जलमय होत आहे. पावसाने पुलावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, या पुलासह रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दराफाटा-म्हसावद रस्ता खड्यात
धडगाव, तोरणमाळकडे जाणाऱ्या दराफाटा-म्हसावद रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे असभ्य दुर्लक्ष झाले असून, यामुळे वाहनधारकांना आपला जीवदेखील गमावला लागला असून, अजून कित्येक जणांचा जीव जाण्याची वेळ पाहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांकडून उमटत असून, खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे.