लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील अग्रवाल भवनमध्ये २५ जून रोजी एक विवाह सोहळा पार पडला. मात्र या विवाहसोहळ्यात वधूचा मेकअप करणारी ब्युटीशियन महिलाच कोरोना पॉझीटिव्ह निघाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या वेळी वधूसह चार व्यक्तिंना नवापूर येथील संस्थापक विलगीकरण कक्षात हलविण्यात आले असून, इतर सहभागी २५ व्यक्तिंना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.विसरवाडी येथील एका कुटुंबात २५ जून रोजी विवाह सोहळा पार पडला. यातील वधूही अडावद, ता.चोपडा, जि.जळगाव येथील आहे. या वधूचा शृंगार करण्यासाठी आलेली ४० वर्षीय ब्युटीशियन महिलादेखील अडावद, ता.चोपडा येथून २४ रोजी आली होती. ही महिला एक दिवस विसरवाडी येथे मुक्कामी होती. मात्र ३० जून रोजी ब्युटीशियन महिला कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे निदान झाल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली.या ४० वर्षीय ब्युटीशियन महिलेचा संपर्क भुसावळ येथील एका बाधित नवरदेवाशी झालेला होता. या नवरदेवाच्या संपर्कात या महिलेचे नाव होते. तिचा स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आला असता तो ३० रोजी पॉझीटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.या महिलेने विसरवाडी येथे झालेल्या विवाह सोहळ्यातील वधूचा व काही नातेवाईकांचा मेकअप केला आहे. या पार्श्वभूमीवर नवरदेव, नवरी, नवरदेवाची आई व लहान भाऊ या चार जणांना नवापूर येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. तसेच विवाह सोहळ्यातील ब्राह्मण, आचारी, वाहनचालक व नवरदेवाचे नातेवाईक अशा एकूण २५ जणांना आरोग्य विभागातर्फे होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोना पॉझीटिव्ह महिला विसरवाडी येथे एक रात्र मुक्कामी राहून गेल्याने तिच्या संपर्कात नववधूसह काही व्यक्ती आल्याचे मंगळवारी रात्री समजताच विसरवाडी येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यात दिलासादायक बाब अशी आहे की, या लग्न सोहळ्यात फारच कमी व्यक्ती सहभागी झाले होते. त्यामुळे संभाव्य धोका कमी झाला.या वेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत वसावे, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गताडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता जाधव, डॉ.शीतलकुमार पाडवी, डॉ.प्रसाद सोनवणे, डॉ.दामोदर डोंगरे, आरोग्य कर्मचारी तसेच सर्व आशा वर्कर यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच विसरवाडी ग्रामपंचायतीतर्फे येथील नवी दिल्ली परिसरात औषध फवारणी करण्यात आली.विसरवाडी येथील विवाह सोहळ्यात आलेली बाधित व्यक्ती ही नवापूर तालुक्यातील नसून बाहेर जिल्ह्यातून आलेली आहे. याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपला तालुका कोरोना मुक्त असून, परजिल्ह्यातील व्यक्तींना कोणीही आपल्या गावी आमंत्रित करू नये, घराबाहेर निघताना मास्कचा वापर करावा. आपसात सामाजिक अंतर राखावे असे, आव्हान गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व सरपंच बकाराम गावीत यांनी केले आहे.
लग्नात वधूची मेकअप करणारी महिला पॉझीटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:40 PM