लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे वनवृत्तात समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील वनेक्षात संचार करणा-या हिंस्र प्राण्यांचा एकाच आठवड्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात सात आणि ११ वर्षीय मादी बिबट्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू हा अन्न पाण्याविना झाल्याचे शवविच्छेदन करणा-या पशुवैद्यकीय अधिका-यांनी सांगितले आहे. दिवसाला किमान तीन किलोपर्यंत मांसाहारी अन्नाची आवश्यकता असलेले हे वन्यजीव अन्नाच्या शोधात गावठाण हद्दीमध्ये येवूनही त्यांची भूक भागत नसल्याने पशुवैद्यकीय अधिका-यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान साक्री तालुक्यातील नंदुरबार हद्दीत ठाणेपाड्यात येणारा बिबट्या हा सहा वर्षीय तर बोरद येथे मयत झालेली मादी बिबट्या ही ११ वर्षाची असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असताना वन्यप्राण्यांना एखाद्या रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे दोघी मयत बिबट्यांचा व्हिसेरा घेत नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या व्हिसेराचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एकाच आठवड्यात दोन बिबट्यांचा भूकेने मृत्यू झाल्याने वनक्षेत्रातील त्यांच्या अन्न साखळीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षात अन्न पाण्याविना मृत्यू झालेल्या प्राण्यांची संख्या अधिक असून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तसेच अन्नपुरवठा करण्याच्या उपाययोजना थंडावल्याने हे हिंस्र प्राणी शेतशिवाराची वाट धरत आहेत. यात गावठाण शिवारात पाळीव जनवारांवर हल्ले करुनही योग्य तेवढे अन्न मिळत नसल्याने बिबट्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नंदुरबार, तळोदा व तोरणमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक बिबटे असून याठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून करण्यात आली आहे.
तळोदा तालुक्यात गेल्या चार वर्षात दोन बिबटे व एक तरस भूकबळी ठरला आहे. नंदुरबा व नवापूर तालुक्यात प्रत्येकी एक बिबट्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे. या बिबट्यांना दिवसाला किमान अडीच ते पावणे तीन किलो मांस आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त के.टी.पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता, बिबट्यांचा मृत्यू हा अन्न व पाणी न मिळाल्याने झाला असावा. हे वन्यप्राणी भूकबळी ठरू शकतात. दरम्यान वनविभागाकडे वृद्ध बिबट्यांचा सांभाळ करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही.
तळोदा तालुक्यात किमान आठ, शहादा चार, तोरणमाळ ५, नंदुरबार ३ तर नवापूर तालुक्यात दोन बिबटे सध्या संचार करत असल्याची माहिती आहे. यातील वृद्धांची माहिती मिळालेली नाही.