-रमाकांत पाटीलगेल्या दोन दशकांपासून जिल्ह्याचे राजकारण हे डॉ.विजयकुमार गावीत यांच्या घराण्याभोवतीच फिरत असून यावर्षीही निवडणुकीची चाहूल सुरू होताच राजकारण पुन्हा एकदा या घराण्याभोवती केंद्रीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी चार महिन्याचा कालावधी असताना एकीकडे यावेळची निवडणूक खासदार डॉ.हीना गावीत ह्या राष्ट्रवादीकडून लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली तर दुसरीकडे स्थानिक स्तरावर मात्र त्याला काँग्रेसचा विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे हुडहुडणा:या थंडीतही जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.नंदुरबार जिल्हा व लोकसभा मतदारसंघ हा गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1995 मध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. हळूहळू डॉ.गावीतांनी विधानसभेत आपले स्थान भक्कम केले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही प्रवेश केला. गेल्या पाच वर्षापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्तादेखील काबीज केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या डॉ.हीना गावीत यांना भाजपाची उमेदवारी देऊन त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेल्या 40 वर्षाची काँग्रेसचे वर्चस्व मोडून त्या विजयी झाल्या. त्यापाठोपाठ डॉ.विजयकुमार गावीत यांनीही भाजपामध्ये प्रवेश करून तेदेखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. गेल्या पाच वर्षापासून ते भाजपात आहेत. या काळात त्यांना राज्यात किंवा त्यांची कन्या खासदार डॉ.हीना गावीत यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सातत्याने राहिली. पण निवडणुका जवळ आल्या तरी त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता 2019 मध्ये होणा:या नवीन निवडणुकांची चर्चा सुरू झाली.गेल्या पाच वर्षात डॉ.गावीत यांना किंवा खासदार डॉ.हीना गावीत यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकारणात सातत्याने चर्चेत राहिली. दुसरीकडे स्थानिक स्तरावरही जिल्ह्यात जुन्या भाजपाच्या कार्यकत्र्याशी त्यांचा सूर न जुळल्याने पक्षातच काही कार्यकर्ते त्यांना विरोध करू लागले. पण डॉ.विजयकुमार गावीत यांचे जिल्ह्यात एक वेगळे वलय आहे. त्यांनी स्वत:ची मोठी फळी उभी केली आहे. त्यांना मानणारा गट जिल्ह्यात मोठा आहे. परिणामी त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. ही स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेस विरुद्ध डॉ.गावीत असे दोनच मोठे गट आहेत. त्यामुळे डॉ.गावीत ज्या पक्षात जातील त्या पक्षाविरुद्ध काँग्रेस असे गेल्या दोन दशकातील राजकारणाचे चित्र आहे. यावेळीदेखील त्यापेक्षा वेगळे चित्र नाही.यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्य आणि केंद्र स्तरावर पक्षाच्या आघाडी आणि युतीची बांधणी सुरू झाली आहे. डॉ.गावीत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना प्रभावशाली मंत्री होते. साहजिकच राष्ट्रवादीतर्फे राज्यात जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्याची चर्चा सुरू झाली. त्यात डॉ.गावीतांचे नाव चर्चेत येणे स्वाभाविकच आहे. नंदुरबारची लोकसभेची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे सव्रेसर्वा शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. तशा बातम्या यापूर्वी चर्चेत आल्या. म्हणून नंदुरबारची जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर या पक्षातर्फे डॉ.हीना गावीत याच उमेदवार राहतील, असा कयास लावला जात आहे. दुसरीकडे भाजपातर्फे राज्यातील 11 विद्यमान खासदारांना या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे संकेत पक्षाने दिल्याची चर्चाही सुरू झाली. त्यात नंदुरबारचे नावही वृत्तवाहिन्यांनी चर्चेत आणले. या चर्चामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील डॉ.गावीत यांचा विरोध सुरू केला आहे. काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये त्यांना काँग्रेसमध्ये अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे राजकारणाच्या गरमागरम चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाल्या आहेत.खरे तर अद्याप या सर्व बाबी चर्चा म्हणूनच आहे. डॉ.विजयकुमार गावीत यांनीदेखील आपण भाजप सोडणार नाही, असा खुलासा केला आहे. निवडणुकीला अद्याप चार महिने असल्याने अजून किमान महिना-दोन महिने याच चर्चा सुरू राहणार असून या निवडणुकीतही कोण कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढवेल हे येणारा काळच ठरवणार असला तरी यंदाची लढाईदेखील डॉ.गावीत विरुद्ध काँग्रेस अशीच राहील हे मात्र तेवढेच खरे.
2019 मध्येही जिल्ह्याचे राजकारण गावीतांभोवतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 1:13 PM