लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी शहाद्यात घडली. नदीतील वाळूचा मोठय़ा प्रमाणात उपसा होऊन झालेल्या खड्डय़ात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची चर्चा आहे. गरीब नवाज कॉलनी परिसरातील साजिद नाजीम शेख (18) हा रविवारी शाळेला सुटी असल्याने गोमाई नदीवर मित्रांसह आंघोळीला गेला होता. काही मित्र नदीकाठी बसून होते तर काही आंघोळीसाठी पाण्यात उतरले. पैकी साजीद हा आंघोळ करताना पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावर मित्रांनी परिसरातील नागरिकांना बोलावून त्याला बाहेर काढले. नगरसेवक वाहिद पिंजारी, मनोदय पिंजारी, रफिक आदींनी साजीदला पाण्याबाहेर काढून तातडीने जवळच्याच खाजगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. नंतर पालिका रूग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत साजीद हा वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील ट्रक चालक असून त्याच्या पश्चात कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. गेल्याच महिन्यात सुटीची संधी साधून दरा धरणात आंघोळीसाठी गेलेल्या तीन तरूणांचा बुडून मृत्यू झाला होता. ते तिघेही बारावीचेच विद्यार्थी होते. त्यानंतर लागोपाठ ही दुसरी घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:42 PM