ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेली जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांसाठीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार तीन दिवसांपासून त्या त्या गट व गण क्षेत्रात आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे. जुलै महिन्यात स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया मंगळवार, २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. २७ सप्टेंबर माघारीची मुदत आहे. ५ ऑक्टोबर मतदानाची तारीख आहे.
निवडणूक होणारच ही बाब स्पष्ट झाल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, रनाळे, कोळदे, शनिमांडळ व खोंडामळी या गटांमध्ये निवडणूक रंगणार आहे. शहादा तालुक्यात लोणखेडा, म्हसावद, पाडळदा या गटांमध्येदेखील लढती रंगणार आहेत. या सर्व ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असून, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या भेटी घेणे, कॉर्नर सभा घेणे यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात उमेदवार ठिकठिकाणी बाप्पांच्या आरतीसाठीदेखील उपस्थिती लावत होते. त्यामुळे त्या माध्यमातूनदेखील प्रचार करण्यात आला. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित असले तरी काही डमी उमेदवार आणि इतर हौसी उमेदवारांच्या माघारीकडेदेखील लक्ष लागून आहे. त्यानुसार त्या त्या गट व गणात उमेदवार संख्या कमी, जास्त होऊ शकणार आहे. त्यामुळे माघारीकडेदेखील अनेकांचे लक्ष लागून राहणार आहे.
प्रशासकीय दृष्ट्याही तयारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील बॅनर, होर्डिंग्ज, कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरदेखील तीच स्थिती आहे. आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विशेष दक्षता घेत आहेत. त्यासाठी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचारी नेमणूक आधीच झालेली असून, लवकरच त्यांचे पहिले प्रशिक्षण घेतले जाणार आहे.