शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून व छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता केवळ २७ सप्टेंबर या एकाच दिवशी सकाळी ११ ते दुपारी तीन या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे.
निवडणूक असलेल्या मतदारसंघात आचारसंहिता सुरू असून प्रत्येक राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे. त्याचप्रमाणे दररोजचा निवडणूक खर्च शहादा तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षाकडे नियमितपणे द्यावा. जे उमेदवार दैनंदिन खर्च देणार नाही अशांवर कारवाई केली जाईल. या निवडणुकीसाठी उपरोक्त मतदारसंघात १८६ पोलिंग बुथची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक बुथवर ८०० मतदार मतदान करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान जाहीर सभा व प्रचार फेऱ्यांसाठी नियमानुसार निवडणूक कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ५ ऑक्टोबरला मतदान होऊन ६ ऑक्टोबरला मतमोजणीअंती निकाल जाहीर केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी ४३ व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी ४३ असे ८६ उमेदवार रिंगणात असून माघारीअंती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व नायब तहसीलदार सुभाष शिरसाठ उपस्थित होते.