येवला/पिंपळगाव : येवला-नांदगाव रोडवर नगरसूल येथील नारंदी नदीच्या पुलावरील वळणावर खैरनार वस्ती जवळ स्विफ्ट डिझायर व कंटेनर यांच्यात भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार तर बाकी चौघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान झाला. जखमीमध्ये एक पुरु ष व तीन महिलांचा समावेश आहे.पुरणगाव, ता. येवला येथील ठोंबरे बंधूंचा कंटेनर (क्र. एमएच ०६ एसी ३९४७) येवल्याकडून नांदगावच्या दिशेने जात होता. तर येवल्यातील श्रावण मोहन जावळे (५७), रूपा श्रावण जावळे (५०), किरण मोहन जावळे (४२) व त्यांची पत्नी सविता किरण जावळे (३८), बहीण सरला कैलास चावारे (४५) असे पाच जण आपल्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच १५ एफएफ १२५५) नांदगावकडून येवल्याकडे येत असताना नगरसूल येथील नारंदी नदीच्या पुलावर हा भीषण अपघात झाला. कंटेनर आणि स्विफ्ट गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने स्विफ्ट गाडी नारंदी नदीच्या पुलाखाली सुमारे ३० मीटर अंतरावर फेकली गेली. स्विफ्ट गाडीचा पुढचा भाग पूर्णत: चक्काचूर झाला.मयत झालेले किरण जावळे ऊर्फ बम्मनकाका यांच्या पश्चात वडील, पाच भाऊ, भावजया, पुतणे, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. किरण जावळे यांच्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात स्वत:चीच स्विफ्ट गाडी चालवित असलेले किरण मोहन जावळे हे जागीच ठार झाले, तर इतर चौघेजण जण जखमी झाले. जखमींना तातडीने नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर येवला येथील सोनवणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.श्रावण जावळे व रूपा जावळे हे गंभीर जखमी असल्याने यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये पाठविले आहे. उर्वरित दोन महिलांवर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. माजी नगरसेवक मनोहर जावळे यांचे श्रावण जावळे व किरण जावळे हे बंधू असून, येवला पालिकेत कामगार म्हणून सेवेत आहेत.