लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्याची बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी (दि.७) जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १४९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ इतकी झाली आहे. दिवसभरात २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९५३वर पोहोचला आहे. यात शहरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १ हजार ८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख उंचावत असून, रुग्णसंख्येत घट होत नसल्याने प्रशासनही चिंतित आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात उपचारार्थ दाखल ७ रुग्ण सोमवारी दगावले, तर मालेगावात एका रुग्णाचा मृृत्यू झाला. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती; रविवारपासून त्यात वाढ होऊन रुग्णांचा आकडा साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहोचला आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार १५२ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७ हजार ७३४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.१ हजार ८१४ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ५९९ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या १५२५ झाली आहे. १११९ रुग्णांनी कोरोना मात केली असून, आजपर्यंत ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाला प्राप्त अहवालांमध्ये शहरातील २४ तर ग्रामीण भागातील ४ असे २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांवर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५७० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार २१७ रु ग्ण शहरातील आहेत. १ हजार १४९ रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीण मधील ३४३ तर मालेगावातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३० हजार ७८७ झाली आहे.तर ग्रामीणचा बाधितांचा आकडा १० हजार ९०५ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ३८ रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ७ हजार ७६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत एकूण रुग्णसंख्या २ हजार ९०३ इतकी असून, त्यापैकी २ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत.