पंचवटी : सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला असून चोरट्यांनी आता किराणा दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवरील एका घाऊक किराणा मालविक्रीच्या दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी खाद्यतेलाचे एकूण ८६ डबे व ४० खोके लंपास करत तब्बल १ हजार २१० लीटर्स खाद्यतेलासह ३० किलो वजनाचे साबुदाण्याचे ८ कट्टे लांबविल्याची घटना घडली. अशाच प्रकारची पहिली घटना मार्च महिन्यात घडली होती.
दिवसेंदिवस खाद्यतेलासह डाळी व दररोज लागणाऱ्या विविध किराणा मालाच्या किमतींचा भडका उडत चालला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आतापर्यंत सराफी दुकान, मोबाइल दुकान, लॅपटॉप, संगणक विक्रीचे दुकान, मेडिकल, चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे ऐकिवात होते; मात्र आता चोरट्यांनी किराणा दुकानांचेही शटर उचकटण्यास सुरुवात केली आहे.
अशोक स्तंभ येथील रहिवासी किराणा माल व्यावसायिक जितेंद्र मांगीलाल भंडारी यांच्या मालकीचे पेठरोडला शरदचंद्र पवार बाजार समितीबाहेर जे एम ट्रेडर्स नावाचे घाऊक किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवारी (दि.१०) रात्रीच्या वेळी त्यांच्या या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी कापून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी १५ लीटर वजनाचे सोयाबीन, सूर्यफूल खाद्यतेलाचे एकूण १२५ डबे, तसेच ५ लीटर वजनाचे ४८ कॅन तसेच सोयाबीन खाद्यतेलाच्या १ लीटरच्या पिशव्यांचे ३२ खोके (३२० पिशव्या), सूर्यफूल तेलाचे ८ खोके (८० पिशव्या) आणि ३० किलो वजनाचे साबुदाण्याचे आठ कट्टे यासह १० हजारांची रोकड असा सुमारे ४ लाख ७६ हजार ५८० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो---
सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ गायब
चोरट्यांनी खाद्यतेलाचा साठा, साबुदाण्याचे पोते एका मालवाहू लहान टेम्पोमध्ये भरणा करून गायब केले. यावेळी त्यांनी चोरीचा पुरावादेखील दुकानात सोडला नाही. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण ज्या यंत्रात साठविले जाते ते ‘डीव्हीआर’सुद्धा चोरटे आपल्या सोबत घेऊन गेले आहेत. पेठरोडवरील मुख्य महामार्गालगत असलेल्या या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले; मात्र तोपर्यंत रात्रीच्या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला या मोठ्या चोरीचा सुगावा लागू शकला नाही हे विशेष!
--इन्फो--
पंचवटीतील दुकान फोडीच्या घटना अशा...
जानेवारी महिन्यात दिंडोरी रोडवरील दोन वाइन शॉप चोरट्यांनी लक्ष्य केले होते. साडेसहा लाखांचा माल गायब केला हाेता.
मार्च महिन्यात पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीतील श्रीराम ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानाच्या बाथरूमचे गज कापून चोरट्यांनी प्रवेश करत खाद्यतेलाचे डबे, तेलाच्या पिशव्यांचे खोके असा सुमारे १ लाख ७ हजारांचे खाद्यतेल चोरी केले होते. महेश गोविंद ठक्कर यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
---