कळवण (नाशिक) सप्तशृंगी गड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे .ए टी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. या अपघातात १८ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील चार जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अन्य ११ महिलांसह २ पुरुषांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु आहेत.
सदर अपघाताची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला १० लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
दरम्यान, खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.