फटाके गाळे लिलाव : यंदा १३३ गाळ्यांनाच प्रतिसाद
नाशिक : महापालिकेमार्फत फटाक्यांच्या गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण झाली असून, गतवर्षाच्या तुलनेत उत्पन्नात यंदा दहा लाख रुपयांचा फटका बसला आहे. एकूण ३४० पैकी १३३ गाळ्यांनाच विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. यावर्षी महापालिकेने निवासी भागाऐवजी खुल्या मैदानावरच फटाके विक्रीला परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे.दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना महापालिकेमार्फत यंदा फटाक्यांच्या गाळ्यांची लिलावप्रक्रिया शनिवार (दि.१४) पर्यंत सुरू होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा निवासी भागात फटाके विक्रीस पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा खुल्या जागांवरच फटाके विक्रीसाठी परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार, पहिल्यांदा प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा मैदानांवरील २५५ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबविली परंतु, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळून केवळ १५ गाळ्यांना बोली लागली. दरम्यान, गाळ्यांची संख्या वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दबाव सुरू झाल्यानंतर मैदानांची संख्या वाढवून गाळ्यांची संख्या ३४० वर नेण्यात आली.दुसºयांदा गाळ्यांची लिलावप्रक्रिया राबविण्यात आली असता ९० गाळ्यांना प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तिसºयांदा शनिवारी (दि.१४) लिलावप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात २८ गाळ्यांना बोली लागली. आतापर्यंत एकूण १३३ गाळ्यांना प्रतिसाद मिळाला. त्यात संभाजी स्टेडिअममध्ये ५० पैकी केवळ एकच गाळा गेला तर तपोवनात ५० पैकी ७ गाळ्यांना प्रतिसाद मिळाला. मात्र, नाशिकरोड भागातील चेहेडी पंपिंग परिसरातील जागेसाठी एकही विक्रेता फिरकला नाही. महापालिकेला १३३ गाळ्यांच्या माध्यमातून यंदा २५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.मागील वर्षी गाळेभाडेपोटी ३५ लाख ७९ हजार ७५० रुपये महसूल प्राप्त झाला होता. यंदा कडक नियमावलीमुळे महसुलात दहा लाखांनी घट झाली. दरम्यान, गाळेविक्रेत्यांना अग्निशमन दलाने तयार केलेल्या नियमावलीनुसारच गाळे उभारावे लागणार असून, नियमभंग करणाºया विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.डोंगरे मैदानावर २५ गाळ्यांना परवानगीडोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर यंदा फटाकेविक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका प्रथम अग्निशमन विभागाने घेतली होती. परंतु, नंतर डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानावर २५ गाळ्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर गाळेधारकांकडून अग्निशमन बंबासाठी प्रतिदिन १५ हजार रुपये भाडे वसूल केले जाणार असून, प्रतिदिन ५०० रुपये दाखला फीसुद्धा घेण्यात येणार आहे. डोंगरे मैदानावर फटाका विक्रेता संघटनेला परवानगी मिळाल्यानंतर गाळे उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.