कळवण : वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना ग्रामीण पोलिसांनी कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावरून एकास पिशवीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून १० लाख रु पये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ५ संशयितांना अटक करून १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. भाऊराव गायकवाड विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भैताणे फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून पिशवीमध्ये तस्करीसाठी बिबट्याची कातडी घेऊन जाणाऱ्या भाऊराव रामचंद्र गायकवाड याची पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तपासणी केली असता बिबट्याच्या कातडी तस्करीचे प्रकरण उघडकीस आले.भैताणे फाट्यावर शुक्र वारी सायंकाळी पथकाने सापळा रचला. पिशवी घेऊन उभा असलेल्या भाऊराव गायकवाड याच्याकडे चौकशी केली असता तो गोंधळून गेला. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासणी केल्यावर त्यामध्ये दहा लाख रु पये किमतीचे बिबट्या चे कातडे आढळून आले.वनसंरक्षक सुरगाणा विभागाचेसुजित नेवसे, कनाशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.आर. कामडी, कळवणचे बी.आर. शेख, फिरत्या पथकाचे व्ही.बी. पाटील, वन परिक्षेत्र कार्यालय दिंडोरी येथील दशरथ कडाळे यांनी केलेल्या चौकशीत संजय सीताराम भानसी (४७), राजू पंढरीनाथ चौरे (३०)दोघे रा. भाडणे, विश्वनाथ परशराम पालवी (३४) रा. वडाळेवणी, अमरचंद महादू बागुल (५४), रा. उंबरेबन या चार संशयितांना ताब्यात घेतले असून, चौकशीअंती सहआरोपीना अटक केली. तपासामध्ये कळवण तालुक्यातील वडाळा भागामधून बिबट्याची शिकार करून कातडे भाऊराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.नाशिक येथील तस्कराकडे भाऊराव गायकवाड ते कातडे विक्र ीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.शनिवारी सायंकाळी संशयितांना कळवण न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी १९ जानेवारीपर्यंंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांना अभोणा पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले आहे.सदरची कातडी कोठून आणली व विक्र ीसाठी कोठे जाणार होती याचा तपास सुरू असून, यामागे तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाशिक ग्रामीण पोलिसांनी वर्तविली आहे.
कळवण तालुक्यात बिबट्याची १० लाखांची कातडी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:11 AM