नाशिक - शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जवळपास १००-१५० घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच १५-२० अग्निशमन बंबांच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. येथील सर्व रहिवाशी बेघर झाले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था बी. डी. भालेकर मैदान येथे करण्यात आली आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली. अतिशय दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळ असलेला हा परिसर असल्यामुळे काही क्षणात सहकार नगरमधील १०० ते १५० घरे आगीत जळून खाक झाली. घरातील जवळपास ७ पेक्षा अधिक सिलेंडर्सचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडत होते तर संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.
करोनामुळे परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले असल्यामुळे सुरुवातीला या परिसरात अग्निशमन बंब यायला काहीसा उशीर झाला होता. आगीची तीव्रता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या नाशिकमध्ये येणारे रस्ते उघडण्याचे आदेश दिल्यानंतर हा परिसर वाहतुकीस खुला झाला. यावेळी बंद केलेले सारडा सर्कल, शिंगाडा तलाव, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातील बेरीकेटिंग काढून टाकत अग्निशमनच्या वाहनांना रस्ता मोकळा करण्यात आला.
घटनास्थळी खासदार हेमंत गोडसे, नगरसेविका हेमलता पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे भद्रकाली पोलीस स्टेशन, मुंबई नका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता.
या आगीत जनावरे जखमी झाले असल्याचे समजते. आगीचे प्रचंड लोळ बाहेर येत असल्यामुळे या जनावरांना ज्वाला बसल्या आहेत. यावेळी गल्लीबोळ, अरुंद रस्ते यातून मार्ग काढत अग्निशमन विभागाला कसरत करत पाईपच्या माध्यमातून १५ ते २० बंबांनी आग आटोक्यात आणली. यावेळी स्थानिक तरुणांनी पुढे येत गल्लीबोळातून मार्ग काढत अग्निशमन विभागास मदत केली. बेघर झालेल्या रहिवाशांची तात्पुरती सोय बीडी भालेकर मैदानामध्ये करण्यात आली आहे.
दोन फायरमन जखमी
आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे महापालिकेच्या सर्व केंद्रातून बंब याठिकाणी मागविण्यात आले होते. दाट लोकवस्ती आणि दाटावाटीचा परिसर असल्याने वाहनांना आत शिरता येत नव्हते. दरम्यान, काही फायरमन्सने इतर घरांच्या भिंतींवर उभे राहून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान, एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भिंतीवरून पाणी टाकणारे सिडको केंद्रातील फायरमन जगदीश देशमुख हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर काही फायरमन्सला पत्रे लागल्यामुळे त्यांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.